मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदानावर त्यांची सकाळी ११ वाजता सभा होणार आहे, तर दुपारी ३.५५ वाजता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील एक्झिबिशन ग्राऊंडवर त्यांची जाहीरसभा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधी यांनी भंडारा-गोंदियात सभा घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ते अमरावती आणि सोलापूर जागांवरील काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. राहुल गांधी यांच्या अमरावती येथील सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जयश्री वानखडे यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर सोलापूर येथील सभेला नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कम्युनिस्ट नेते माजी आमदार नरसय्या आडम, दिलीप माने आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.