कोल्हापूर : कोल्हापुर येथील कळंब कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल याची हत्या करण्यात आली आहे. मुन्ना हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंबा कारागृहात आज कैद्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याची हत्या करण्यात आली. मारहाणीत मृत्यू झालेला मुन्ना हा १९९३ च्या मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील तो हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा इतर कैद्यांशी वाद झाला.
यावेळी न्यायालयात बंदी असलेले आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मुन्ना याला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृहात खुनाच्या घटनेचा पंचनामा सुरू आहे.