अहमदनगर: राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) धुळे येथे नेमणुकीस असलेले आणि दौंड तालुक्यातील कौठडी गावाचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे व त्यांचे २ सहकारी पोलीस शिपाई हे सुगाव बु. (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे प्रवरा नदीमध्ये दोन मुले बुडाली असता त्यांचा शोध व बचावकार्य करण्यासाठी गेले होते. त्यानंतर आज २३ मे रोजी बोट पलटी होऊन तिघांना वीरमरण आले असल्याची दुर्दैवी दुःखद घटना घडली आहे. यामुळे कौठडी परिसरासह तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे. मयत पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे यांच्या पाठीमागे आई, पत्नी, 2 मुली असा परिवार आहे.
दरम्यान अकोले येथे प्रवरा नदीपात्रातएसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या घटनेत एसडीआरएफ पथकाच्या तीन जणांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले. या दुर्घटनेतील सागर जेडगुले या युवकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. मात्र अर्जुन जेडगुले याचा शोध बुधवारी उशिरापर्यंत घेतला जात होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी गुरुवार २३ मे रोजी एसडीआरएफचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, शोध कार्य करत असलेली एसडीआरएफ पथकाची बोट सकाळी उलटली. या पथकामध्ये असणारे पाच जण आणि एक स्थानिक असे एकूण सहा जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यामधील तीन जणांचे मृतदेह सापडले असून दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी कथन केला घटनेचा थरार
दरम्यान, या दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी असलेले सुगाव गावचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळी एसडीआरएफचे पथक गावात दाखल झाले होते. त्यांचे शोधकार्य साडेसहा वाजेच्या सुमारास सुरू झाले होते. यामध्ये एसडीआरएफ पथकाच्या दोन बोट पाण्यात उतरल्या होत्या. त्यानंतर काही वेळाने एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याने बोट उलटली. या उलटलेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वरती येता आले नाही, असे त्यांनी सांगितले.
सदर घटनास्थळी पोहचून झालेल्या घटनेची योग्य ती दखल घेवून अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, समादेशक तथा नियंत्रक अधिकारी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळेचे विक्रम साळी, नगर प्रांतअधिकारी शैलेश हिंगे व संबंधित जिल्हा प्रशासन अधिकारी व इतर स्थानिक अधिकारी यांच्याकडून घटनास्थळी शासकीय इतमात शहिदांच्या पार्थिवाना अतिंम मानवंदना देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.