सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयाचे खापर मागील महाविकास आघाडी सरकारवर फोडल्यानंतर आता राज्यातले राजकारण आणखीचांगलेच तापले आहे. कंत्राटी भरतीमधील अग्नीवीर योजना ही मातृयोजना आहे. त्यालाच शिंदे फडणवीस पवार सरकार समर्थन करत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. चव्हाण यांनी म्हटले की, शिंदे-फडणवीस- पवार सरकारने काढलेला 23 सप्टेंबरचा महत्त्वांच्या कार्यकारी पदांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांनी चुक सुधारली ही खूप चांगली गोष्ट आहे. तसेच कंत्राटी भरती मधील अग्नीवीर योजना ही मातृयोजना आहे. त्याचे शिंदे- फडणवीस-पवार सरकार समर्थन करत आहे. पहिल्यांदा ती योजना रद्द करा, नाहीतर जनतेचा रेटा तुम्हाला माहिती आहे, असा इशाराही चव्हाण दिला.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, विदर्भात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.
नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन आपण नागपूरमध्ये घेतो. यानिमित्ताने विदर्भातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. यराज्य सरकारने यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. सत्ताधारी असताना आणि विरोधी पक्षात असताना वेगळी भूमिका घ्यायची हा या सरकारचा दांभिकपणा आहे, असे टीकास्त्र ही त्यांनी सोडले.