सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये त्यांनी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले. यावेळी भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनिक झाले होते. असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत तयार करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदीमचाय गस्ते झाले.
मराठीतून मोदींची भाषणाला सुरुवात
“पंढरपूरच्या विठ्ठलाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत आहे. 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी 11 दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादाने मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली.” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
भर भाषणात मोदी भावूक, आवंढा गिळला
‘मी ही घरे पाहिली, मला या घरांचा हेवा वाटला. लहाणपणी आम्हाला असे घर मिळाले असते तर…हे सांगताना नरेंद्र मोदी यांचा कंठ दाटून आला मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला. महाराष्ट्रातील एक लाख लोकांना हक्काचे घर मिळत आहे. आम्ही चार कोटी पेक्षा जास्त पक्की घरे बनवली आहेत. आज 1 लाखा पेक्षा जास्त कुटूंबांचा गृह प्रवेश होईल.’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
काँग्रेसवर टीका
कामगार वसाहतीच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान, मोदींनी गरीबी हाटवचे नारे देणाऱ्या काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, देशात दीर्घकाळपर्यंत गरीबी हाटव नारे लावले गेले. परंतु गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या. परंतु त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता. म्हणजे आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती.
२५ कोटी लोक गरीबीतून वर आले
देशातील २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले. आम्ही फक्त देशातील गरीबांना साधन दिले. त्यांनी स्वत: गरीबीतून वर येण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमामुळे होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.