सोलापूर : लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असताना सोलापुरात मतदानाच्या दोन दिवस अगोदर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या टीमकडून जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे या संपूर्ण मतदारसंघात तालुका पातळीवर कृतज्ञता मेळावे घेत आहेत. शनिवारी १५ जून रोजी दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्राचा कृतज्ञता मेळावा जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी हा गौप्यस्फोट करत सोलापुरात भाजपकडून जातीय दंगल घडविण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे म्हणाल्या की, सोलापूरची लोकसभा निवडणूक आपल्या हातून निसटली आहे, हे फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलेच माहीत होते. म्हणूनच मतदानाच्या दोन दिवस आधीच जातीय दंगल घडविण्याचा त्यांचा डाव होता. भारतीय जनता पक्षाच्या संबंधित नेत्यांनी सोलापूरमधील मतदानाच्या पाच दिवस आधी निवडणूक प्रचारात केलेली भाषणे काढून पाहा. त्या सर्वांच्या हालचालीही तशाच होत्या. यामधून त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो, असा थेट आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
सुदैवाने शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे निवडणूक काळात दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दांगली घडविण्याचा डाव आखला जात असताना सतर्क राहिले. त्यांनी कणखर भूमिका घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यामुळे हा प्रसंग टळल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे.