खंडाळा : पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरवळजवळ असलेल्या गोकुळ लॉजवर छापा टाकत वेश्याव्यवसाय चालक असलेल्या लॉज मालक व एक पिडीत महिला अशा दोन जणांना उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाने कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला.
याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि.८) उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत बनावट ग्राहक गोकुळ लॉजवर पाठवुन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री करत विनोद गोविंद अग्रवाल (वय ५२, रा. धनगरवाडी) एक पीडित संबंधितांना ताब्यात घेत शिरवळ पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर केलेल्या चौकशीवरून हॉटेल मालक महिलांकडून वेश्या व्यवसाय करवत असल्याचे स्पष्ट झाले.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाने कारवाई करत संशयितांना पकडल्याने शिरवळमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. याबाबत वैभवी भोसले निर्भया पथक फलटण यांच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन, पोलिस निरीक्षक संदीप जगताप अधिक तपास करत आहेत.
सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस हवालदार आहीवळे, पोलिस कॉन्स्टेबल लवटे, म पो काँ. कुदळे, कोळेकर, पोलिस नाईक शेख यांच्या पथकाने केली.
पुन्हा ‘गोकुळ’च का?
शिरवळ हद्दीतील शिंदेवाडी येथील “गोकुळ लॉज”वर पुन्हा कारवाई झाल्याने या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार कोण हे शोधणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. किती वर्षांपासून लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू होता? यामध्ये आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे? वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला कोणाकडून येत होत्या? आणखी पीडित महिला आहेत का? आणि आता पुन्हा “गोकुळच” का असे सवाल या कारवाईमुळे उपस्थित केले जात आहेत.