पंढरपूर, ता.10: विक्री केलेल्या जमीनीची नोंद तलाठी यांनी पकडल्यानंतर ती नोंद फेटाळली आहे. असे सांगून सदरची नोंद मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करकंब (ता पंढरपुर) येथील मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई पंढरपुर (Pandharpur News) तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे गुरुवारी (ता.9) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास केली आहे.

राजेंद्र भगवान वाघमारे (वय 53, मंडल अधिकारी, करकंब, ता पंढरपुर, जि सोलापुर, रा.ठी. भालवणी, ता पंढरपर, जि सोलापुर (वर्ग-3) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 46 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्याची जमीन विक्री केली होती. या जमीनीची नोंद संबंधित तलाठी यांनी पकडल्यानंतर ती नोंद मंजूरीकारिता मंडल अधिकारी वाघमारे यांच्याकडे पाठवली होती. परंतु, त्यांनी सदर नोंद फेटाळली असल्याचे सांगून, ती नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी वाघमारे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, तक्रारदार याच्याकडे जमीनीची नोंद मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पत्र झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंढरपुर तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी वाघमारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
दरम्यान, आरोपी लोकसेवक वाघमारे यांच्यावर पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते करत आहेत.







