Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता. ५ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील फील गार्ड कंपनीमधून घरी जात असताना, पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गावरून भरधाव वेगाने चाललेल्या कारने कामगाराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात संताप व्यक्त होत आहे. Loni Kalbhor News

मिळालेल्या माहितीनुसार, राज सियाराम कुमार (वय २९, रा. वाकवस्ती, लोणी काळभोर) हे फील गार्ड कंपनीमध्ये एअरबॅग बनवण्याचे काम करतात. दिनांक ११ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५.३३ वाजता रात्रपाळी संपवून ते पायी घरी जात होते. सोलापूर-पुणे महामार्गालगतच्या साईड रोडने जात असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.Loni Kalbhor News
धडक इतकी जोरात होती की, राज कुमार रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. मात्र धडक दिल्यानंतर संबंधित चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमली. त्यानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना खाजगी रुग्णवाहिकेद्वारे पुण्यातील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. Loni Kalbhor News
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने फरार वाहनचालकाचा शोध सुरू असून, अशा हिट-अँड-रन घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






