पाचगणी / लहू चव्हाण : पर्यटननगरी पाचगणी शहरात रामनामाच्या गजरात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगल अक्षता कलश शोभा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी शहर परिसरातील १५ गावातील ग्रामस्थांना मंगल अक्षता कलश वितरित करण्यात आले.
सायंकाळी चारच्या सुमारास टाळ मृदुंग, भजन व राम नामाचा गजर करत काढलेल्या शोभायात्रेत महिला भगिनींसह शेकडो रामभक्तांचा सहभाग होता. यामुळे शहरात भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते. या यात्रेत पाचगणी व परिसरातील लोकप्रतिनिधी, विविध मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचशे वर्षांच्या अथक परिश्रमानंतर न्यायालयीन पुराव्याने अयोध्येत प्रभू श्रीराम भव्यमंदिर होत असून, या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पार पडणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभरात अयोध्येतून पूजीत असे अक्षदा कलश पाठवले गेले आहेत. या अक्षदा १ ते १५ जानेवारी या काळात सर्व राम सेवकांकडून प्रत्येक गावात खेड्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. या अक्षदा कलशाची शहरातील श्री राम जन्मभूमी उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद यांच्याद्वारे भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पांचगणी व परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
रथयात्रा बसस्थानकासमोरील साई मंदिरापासून सुरू झाली. ही रथयात्रा गावठाण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे विठ्ठल मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी पाचगणी परीसरातील पंधरा गावांना अक्षदा कलश वितरण करण्यात आले. बुधवार आठवडी बाजार असल्याने पंच क्रोशीतील माता भगिनी व नागरिकांनी मंगल अक्षता कलशाचे दर्शन घेतले.
डॉ. अभय देशपांडे यांनी श्री राम मंदिर इतिहासाबद्दल माहिती दिली. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात श्री राम मंदिराचा फोटो पत्रक व अक्षदा देण्याचा संकल्प करण्यात आला.