-लहू चव्हाण
पाचगणी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमी होत जाणाऱ्या मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेकडून विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू असताना, पाचगणी येथील पुरोहित नमस्ते रेस्टॉरंटनेही खारीचा वाटा उचलत ‘शाई दाखवा अन् खाद्यपदार्थांवर 50 टक्के सूट मिळवा’ उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्यांना कोणत्याही खाद्य पदार्थांवर 50 टक्के सूट मिळणार आहे.
पुरोहित नमस्ते रेस्टॉरंटचे मालक भारतभाई पुरोहित यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. अशा उपक्रमांमुळे निदान ऑफर्सच्या आकर्षणामुळे तरी मतदानाचा टक्का वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये 50 ते 60 टक्के मतदान होते. अर्थात बहुतांश मतदार मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने, मताधिक्याअभावी कोणाचेही स्थिर शासन येत नाही व त्रिशंकू शासनामुळे विकासासाठी ठोस निर्णय घेणे अवघड बनते. बहुतांश उच्चशिक्षित, व्यापारी, अधिकारी आणि महिलावर्ग मतदान करत नसल्याने मतदारजागृतीसाठी सामाजिक संस्था व काही नागरिक वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत आहेत.
पुरोहित नमस्ते रेस्टॉरंटचा सामान्यांत जनजागृती करण्याचा प्रयत्न…
अनेक सुशिक्षित नागरिक मला काय करायचंय अशा भावनेतून मतदान करत नाही. देशाचा विकास आणि चांगले शासन देण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. अशा नागरिकांना जागृत करावे, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आम्ही आमच्या रेस्टॉरंटमधील कोणत्याही खाद्यपदार्थांवर 50 टक्के सूट देणार आहोत.
-भारतभाई पुरोहित, रेस्टॉरंट पुरोहित नमस्ते.
नमस्ते स्पेशल पिझा, पंजाबी डिशेस, चायनीजवर ताव मारा आणि बिलावर 50 टक्के सूट मिळवा, अशी या रेस्टॉरंटची ऑफर आहे. मात्र या ऑफरसाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ती अट म्हणजे ग्राहकांच्या बोटावर मतदान केल्याची शाई असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला बिलावर 50 टक्के सूट मिळू शकते.