लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेला राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक, तर भूमी थिमॅटिकमध्येही सर्वोत्तम कामगिरीबद्दल प्रथम क्रमांक पटकावला आहे. पालिकेने दुहेरी मुकुट पटकावल्याने पर्यटन नगरी पाचगणी शहराच्या नावलौकिक वाढला आहे. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा ४.०’ या अभियानात तसेच भूमी थिमॅटिक उपक्रमात पाचगणी गिरीस्थान नगर परिषदेने १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनाकडून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या दोन्ही श्रेणीत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल पारितोषिक मिळणार असून, त्याचे वितरण लवकरच होणार आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित माझी वंसुधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिनांक १ एप्रिल२०२३ ते दिनांक ३१ मे २०२४ या कालावधीमध्ये राबविण्यात आले.
माझी वंसुधरा अभियान ४.० याचे मुल्याकन झाले यामध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटात पांचगणी गिरिस्थान नगरपरिषद अव्वल ठरली असून नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकवला आहे. याकरिता माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे नामांकन प्रक्रिया पार पडली आहे.
त्याच बरोबर भूमी थीमॅटकी मधील उच्चत्तम कामगिरिबदल पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सहा. सचिव सु. के. निकम यांनी शासन आदेशाव्दारे दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी आदेश पारित केला. हे दोन पुरस्कार प्राप्त झालेबदल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. निखील जाधव या पुरस्कारासाठी सर्व पांचगणी नागरिक तसेच कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले यामुळे पाचगणी शहराच्या नावलौकीकात भर पडली असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले व मुख्याधिकारी यांनी पांचगणी शहरातील सर्व आजी माझी पदाधिकारी, नागरिकांचे आभार मानले आहेत.