लहू चव्हाण
पाचगणी : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होऊ लागला आहे. पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी कर्मचाऱ्यांनी वर्षभर केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून वाढीव बोनस जाहीर केल्याने, पाचगणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
दिवाळी निमित्ताने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. पाचगणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा वाढीव बोनस यावर्षी देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांचा जल्लोष
प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी बोनस जाहीर केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. बोनसच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानत जल्लोष केला.
पाचगणी पालिकेचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्या कडक शिस्तीची कार्यप्रणाली, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विभाग अंतर्गत बदल्या, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई या कारणांमुळे प्रशासक निखिल जाधव विशेष चर्चेत आले होते. पालिकेची थकलेली देणी, करांची थकलेली वसुली यामुळे पालिका निधीच्या खात्यात ठणठणाट झाला होता.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून जाधव यांनी नाहक खर्चास फाटा देत वसुलीवर लक्ष केंद्रित केले होते. कर्मचारी वर्गाने जाधव यांना या कामी मोठी साथ दिल्याने, वसुलीला वेग आला. विकासाची गाडी रुळावर आली. कर्मचाऱ्यांच्या या योगदानामुळेच मुख्याधिकाऱ्यांनी हा बोनस जाहीर केला.