-लहू चव्हाण
पाचगणी (सातारा) : पाचगणी शहराचा नावलौकिक वाढावा, पर्यटनाला चालना मिळावी, भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी मैत्री, बंधुत्व आणि जिव्हाळा असा त्रिवेणी संगम एकत्र बांधून शहरातील प्रत्येक घटकाला एका छताखाली घेऊन होत असलेल्या पांचगणी फेस्टिव्हलचे कौतुक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावर्षी 29, 30 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबर रोजी होणाऱ्या या सोहळ्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही, फेस्टिव्हल समितीच्या शिष्टमंडळास दिली आहे.
शहरी भागातील जनजीवन हे पर्यटन आणि निवासी शाळांवर अवलंबून आहे तर ग्रामीण परिसरातील शेतीवर अवलंबून आहे. गरुडझेप घेतलेल्या जॅम, जेली व तत्सम पदार्थांच्या व्यवसायाने अनेकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना व्यवसायाची संधी मिळावी. तसेच शहराचा लौकिक वाढावा, यासाठी शहरातील नागरिक, अगदी छोट्या व्यवसायिकापासून ते शाळा प्रमुख, नगरपालिका, पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा तसेच हॉटेल व्यवसायिक, घोडगाडीवाले, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब, सार्वजनिक मंडळ हातात हात घालून एकत्र येण्याची संकल्पना 7 वर्षांपूर्वी रुजली आणि त्यातुन आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल उदयास आले.
वर्षानुवर्षे राज्यातील, परराज्यातील पर्यटकाबरोबरच परदेशी पाहुणे, विविध शाळातील माजी विद्यार्थी या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यास हजेरी लावत आहेत. विविध कलाविष्कारांची मेजवानी घेऊन येणाऱ्या या सोहळ्याला गत वर्षी राज्य शासनाच्या पर्यटन कार्यक्रमाच्या श्रुकंलेत स्थान मिळाल्याने या फेस्टिव्हलला उंच टप्पा मिळाला आहे. फेस्टिव्हल कमिटीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, शाहराम जवानमर्दि, सुनील कांबळे, किरण पवार, सुनील बगाडे व अमित भिलारे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना भेटून या वर्षीचा प्रस्ताव, आराखडा व स्मरणिका सादर केली. पांचगणी फेस्टिव्हल हा आदर्शवत उपक्रम असून पांचगणी फेस्टिव्हलचे उत्कृष्ठरित्या आयोजित केले जात असल्याची पावती देत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
फेस्टिव्हलची वाढती गर्दी लक्षात घेता यावेळी होणारे कार्यक्रम संजिवन विद्यालयाच्या कै शरद पंडित स्टेडियमवर…
यावर्षी सोहळ्याचे आयोजन 29, 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. फेस्टिव्हलची वाढती गर्दी लक्षात घेता यावेळी बाजारपेठेत आणि कै भाऊसाहेब भिलारे स्टेडियम येथे होणारे कार्यक्रम कै शरद पंडित स्टेडियम (संजीवन विद्यालय) तसेच इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल दरवर्षी प्रमाणे टेबललँड येथे घेण्यात येणार आहेत. तीन दिवस होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील काईट फेस्टिव्हल, स्पोर्ट्स मॅरेथॉन, आर्ट गॅलरी, सांस्कृतिक कार्यक्रम, वॉलकिंग प्लाझा, लाईव्ह बँड अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.