लहू चव्हाण
पाचगणी : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पाचगणी नगरपालिकेने ‘वेस्ट झोन’मधून देशात प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे पाचगणी नगरपालिकेने देशात नावलौकिक मिळवला आहे.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत केंद्रीय स्वच्छ भारत संचालनालयाचे संचालक रूपा मिश्रा, केंद्रीय नगर विकास विभागाचे सचिव मनोज शर्मा यांच्या हस्ते पाचगणीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वच्छ भारत नागरी अभियानाअंतर्गत पाचगणी नगरपरिषदेने २०२३ साठीचा देशपातळीवरील पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक प्राप्त करत, सलग तिसऱ्यांदा पुरस्कार घेत हॅट्रिक साधली आहे. गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवले जाते. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक वेगवेगळ्या निकषांनुसार सर्वेक्षण करते व देशपातळीवर आणि राज्यपातळीवर विभागनिहाय क्रमांक दिले जातात.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’साठी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेस पश्चिम विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून, प्रशासकीय राजवटीतही नगरपरिषदेचे कार्यक्षम मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. याबाबत बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले की, हा पुरस्कार नगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. पालिका कर्मचारी, नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज हा पुरस्कार मिळवू शकलो. त्यामुळे सर्व नागरिकांचे आभार व अभिनंदन. यापुढेही तमाम पाचगणीकरांच्या सहकार्याने पर्यटननगरी आणखी स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
पाचगणी नगरपरिषदेस स्वच्छ्ता अभियानात पश्चिम विभागात पहिल्यांदाच २०१८ मध्ये पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा २०२१ मध्ये नगरपालिकेने पुन्हा या पुरस्काराला गवसणी घातली होती. आता प्रशासकीय राजवटीतही तिसऱ्यांदा पुरस्कार मिळवून पाचगणी नगरपरिषदेने हॅट्रिक साधली आहे.