पंढरपूर :
भंडीशेगांव/सूर्यकांत भिसे
कुंचे पताका झळकती |
टाळ, मृदंग वाजती ॥
आनंदे प्रेम गर्जती |
भद्र जाती विठ्ठलाचे ॥
भागवत धर्माची पताका फडकावीत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगावरील अतूट श्रद्धा व संतांचे पायी विश्वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा येथे पोहोचला. संत ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या बंधू भेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात सुमारे १० लाख वैष्णवांसह संतांच्या पालखी सोहळ्यानी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. पंढरपूर तालुका प्रवेशानंतर संत ज्ञानदेवांचा व सोपानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगांव मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. उद्या दि.१५ रोजी हे सर्व पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील.
पहाटे वेळापूर मुक्कामी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते माऊलींची नित्य पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. सकाळी ढगाळ वातावरणात सोहळा ठाकुरबुवाकडे मार्गस्थ झाला. सकाळी ८.१५ वाजता सोहळा ठाकुरबुवा येथे पोहोचला. चोपदारांनी रिंगण लावून घेतले. श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी रिंगणाची पाहणी केली. पावणे नउ वाजता भोपळे दिंडीचा ध्वज तर त्यानंतर अश्वांनी नेत्रदीपक दौड करीत तीन फेऱ्या पूर्ण केल्या. अश्वांच्या टापाखालील माती भाळी लावत भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले .
रिंगणाचे अंगणी, करीत टाळ मृदुंगाचा ध्वनी l
नाचले वैष्णव सारे, देहभान हरपूनी ll
रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या-दिंड्या मध्ये विविध खेळ खेळले गेले. चोपदाराच्या निमंत्रणानंतर सर्व दिंड्या माऊलीला मध्यभागी घेवून गोलाकार बसल्या. टाळ मृदुंगाच्या निनादात माऊली माऊली नामाच्या जयघोषात विणेक-यांनी माऊलीला प्रदक्षिणा घातली. देहभान हरपून वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात आसमंत व्यापून टाकला. जणू माऊलीसह वैष्णवांची ब्रम्हानंदी टाळी लागली . हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी व माउलीच्या दर्शनासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, खा. संजय जाधव यांच्यासह लाखो भाविक उपस्थित झाले होते .
उडीच्या कार्यक्रमानंतर माउलींची पालखी ठाकुरबुवा मंदिरात आणण्यात आली. ठाकुरबुवा हे माउलींच्या सोहळ्यातील दिंडीकरी. त्यांनी वारीच्या वाटेवर येथे देह ठेवला. त्यांच्या समाधीवर माऊलींच्या पादुका ठेवून पूजा करण्यात आली. त्यानंतर सोहळा तोंडले बोंडलेकडे मार्गस्थ झाला
दुपारी १२ वाजता पालखी सोहळा बोंडले येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले व तोफांची सलामी दिली. येथे माऊलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींना तोफांची सलामी देउन व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे स्वागत केले. याठिकाणी दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी सोहळा विसावला.
घ्यारे भोकरे भाकरी |
दहि भाताची शिदोरी ॥
नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले-बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. येथे दिंड्यांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळा, माडगं, भाकरी, भात, लोणचे अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदि भागातील गावकरी घेवून येतात आणि वारकरी या शिदोरीचा आस्वाद घेतात.
दुपारी १.३० वाजता ज्ञानराजांचा पालखी सोहळा दसूरपाटीकडे मार्गस्थ झाला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याने संत सोपानदेवांचा सोहळा दसूर पाटी जवळ येताच सोहळा प्रमुख योगी निरंजनाथ यांनी सोपानदेवांचे सोहळाप्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांना श्रीफळ भेट दिले. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल असा जयघोष झाला आणि टाळ, मृदुंगाच्या गजरात बंधू भेटीचा सोहळा येथे रंगला.
संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
पंढरपूर तालुक्याच्या सिमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदि संतांच्या पालख्यांचे टप्पा येथे आगमन होताच तालुका प्रशासनाने सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत जगनाडे, संत चांगावटेश्वर यांचे पालखी सोहळे भंडीशेगांव मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. उद्या दि.१५ रोजी या संतांचे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील.