सोलापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्याने सतत चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुले तानाजी सावंत अडचणीत आले आहेत. शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. एवढचं नाही तर तानाजी सावंत यांनी पक्षाला स्वतःच्या घरचा पक्ष समजणे बंद करावे, अशा शब्दात जिल्हाप्रमुख काळजे यांनी तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी उठाव केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या योजनांमुळे जनता खुश आहे. असं असूनही पक्षात राहून तानाजी सावंत धोका देत असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि पक्षाच्या विरोधात अनेकवेळा बेताल वक्तव्य केली आहेत. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांना समजही दिली आहे. तानाजी सावंत सुधारतील म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक गप्प होतो. मात्र, वारंवार युतीत खोडा घालण्याचे काम ते करत असल्याची टीका जिल्हाप्रमुख काळजे यांनी केली आहे.
पुढे म्हणाले, तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सांवत हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटायला जात आहेत. तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून भेटायला गेल्याचं अनिल सावंत यांनी सांगितल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्यामध्ये राहून तानाजी सावंत असं करत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे, असं काळजे म्हणाले.
तानाजी सावंत यांची हकालपट्टी करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा राजीनामा घेऊन पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी. तानाजी सावंत यांच्या भावाने भाजप ऐवजी ‘तुतारी’चा प्रचार करण्यास सांगितलं होतं. त्यावरून लक्षात येते की हे आपल्यात राहून आपल्याशी गद्दारी करत आहेत, अशी टीका जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी तानाजी सावंत यांच्यावर केली.