कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात माळी कॉलनी येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व देवाचे चांदीचे अलंकार असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. आशीष दिनकर लव्हटे (वय ३३) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आशिष लव्हटे हे १८ मे रोजी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. रात्री त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून त्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, सोन्याची दोन ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅमची अंगठी, दोन ग्रॅमच्या रिंगा, लहान बाळाच्या सोन्याच्या १५ अंगठ्या, चांदीचे पैंजण ६ जोड, गणपतीचे हार, फुले, मुकुट, किरीट, सुपारी, चांदीचे पान, असा दीड ते पावणेदोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
सोमवार, २० मे रोजी फिर्यादी आशीष लव्हटे कोल्हापुरात आले, तेव्हा आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, उपनिरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.