कोल्हापूर : एक कोटींचे सोने असणारी सॅक सुरजितसिंगने पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसमध्ये ठेवली. तीन नंबरच्या सीटवर तो बसला होता. मोबाईल हातात घेऊन सोशल मिडीया चाळत दहा ते पंधरा मिनिटे स्वतःला विसरून गेला. आणि ज्यावेळी भानावर आला तेव्हा दीड किलो सोन्याचे दागिने असणारी सॅक लंपास झाली होती. मोबाईल प्रेमामुळे डोकं आपटून घेण्याची वेळ त्याच्यावर आली. कोल्हापूर बस स्थानकात घडलेल्या या घटनेने जिल्हात खळबळ माजली. यावरून बसस्थानक चोरट्यांचा अड्डाच झाल्याचे अधोरेखीत होते.
सुरजितसिंग याने वडिलांचा व्यवसाय स्विकारला होता. मुंबईतील सोनारांकडून तयार दागिने अथवा सोन्याची लड घेऊन ती पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सराफांकडे विक्री करायचे. या व्यवसायातून कमिशन मिळत होते. मात्र, कोल्हापुरात आल्यानंतर आपल्याला कोट्यवधींचा गंडा बसेल असे त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. सुरक्षेच्या कारणावरून सुरजितसिंग सार्वजनिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनातूनच प्रवास करत असे.
सराफ एजंट सुरजितसिंग सुखदेवसिंग चौहान (रा. वडाळा पूर्व, मुंबई) हा २८ जून रोजी मुंबईतून दीड ते दोन किलो सोन्याचे दागिने घेऊन बाहेर पडला. २८ व २९ जून असे दोन दिवस पुण्यात नातेवाईकाकडे थांबून तेथील सराफ व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन काही सोन्याचे दागिने त्यांना विक्री केले.
त्यानंतर ३० जून रोजी कोल्हापुरात आला. दिवसभर कोल्हापुरातील गुजरी, स्टेशन रोडवरील सराफ दुकानात जाऊन दागिने दाखवले. पण पावसाळ्यामुळे मंदी असल्याने कोल्हापुरातील एकाही सराफाने त्याच्याकडील सोन्याचे दागिने विकत घेतले नाहीत. शिवनेरी बसमधून परत जाताना त्याच्याकडील दीड किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी होतोहात लंपास केले.
कोल्हापूरातील बसस्थानक म्हणजे चोरट्याचा अड्डाच बनला आहे. कधी दुचाकी तर कधी मोबाईल, पैशाची पाकीटे, तर दागिण्यांची पर्स चोरीस जाण्याचे प्रमाण या स्थानकात सातत्याने घडतात. शाहूपुरी पोलिसांनी बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र ते पुरेसे नाहीत. दररोज हजारो प्रवाशांची ये जा होते. शेकडो एस. टी. बस येतात व जातात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे दिसून येते. मोबाईल व पर्स लंपास होण्याच्या घटना वारंवार घडतात. यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकात पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.