सांगली : राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असून राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सभा होत आहेत, बैठका पार पडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या बाबत धक्कादायक विधान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळा चौकशीचं खापर आर. आर. पाटील यांच्यावर फोडलं आहे.
अजित पवार म्हणाले की, ‘सिंचन घोटाळा प्रकरणातील फाइलवर आर. आर. पाटील यांची सही होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं. आबांनी केसाने गळा कापला’, असा धक्कादायक आरोप अजित पवार यांनी केला आहे. तासगाव येथील सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. सिंचन योजनेतल्या 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचार फाईलचं गुपित अजित पवार यांनी आज तिसगाव येथील सभेत भाषण करताना सांगितलं आहे.
माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम..
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. 70 हजार कोटींची भ्रष्टाचाराचा आरोप झाला, फाईल तयार केली. आर आर पाटील यांनी अजित पवारांची ओपन चौकशी करण्याच्या फाईलवर सही केली. त्यावेळी आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला असं वाटलं. त्या फाईलवर कोणी सही केली हे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला दाखवलं होतं, असं धक्कादायक विधान अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.