सोलापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. तर महाविकास आघाडीला मात्र पराभव पत्करावा लागला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर तब्बल ७५ लाख मतदान वाढल्याचा विरोधकांचा आरोप असून आता सोलापूर जिल्ह्यातही विरोधकांकडून ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करत सत्ताधारी उमेदवारांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेण्यात येत आहेत.
माळशिरस तालुक्यातील मारकवाडी गावाने भाजपचे राम सातपुते यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेतला असून बॅलेट पेपरवर विधानसभेप्रमाणे मतदान घेण्याची तयारी दाखवली आहे. त्या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च करण्याची तयारी देखील गावाने दर्शवली आहे. त्यामुळे प्रशासन बॅलेट पेपरवर पुन्हा विधानसभा प्रक्रियेप्रमाणे मतदान घेण्याची परवानगी देणार का?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत ईव्हीएमच्या विरोधात विविध मार्गाने आवाज उठवत आहे. महाविकास आघाडीच्या राज्यभरातील अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. अनेक जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार, माजी आमदार नरसय्या आडम यांच्याकडून तर मतदासंघातील विधानसभेची निवडणूकच रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मारकवाडी गावात एकूण 2300 मतदानापैकी 1905 मतदान..
माळशिरस तालुक्यातील मारकवाडी गावात एकूण 2300 मतदानापैकी 1905 मतदान झाले आहे. मतमोजणीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले आहे. मात्र, ग्रामस्थांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते (सुमारे 1000) यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेतला आहे. जानकर यांना मानणाऱ्या या गावात सातपुते यांना मताधिक्क मिळणं अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून गावकऱ्यांनी फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. मारकवाडी गावाने विधानसभा निवडणुकीप्रमाणे बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्यावे. त्यासाठी येणार संपूर्ण खर्च करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे. माळशिरसच्या तहसीलदारांकडे गावकऱ्यांनी खर्चाची रक्कम भरून फेर मतदानाची प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे.