कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून गौरी गणपती सणानिमित्त माहेरी आलेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना राधानगरी तालुक्यातील घोटवडे गावात घडली आहे.
प्रमिषा पडवळ असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिषा पडवळ या महिलेचा पडवळवाडी (ता. गगनबावडा ) गावातील चैतन्य पडवळ या व्यक्तीशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच या महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचा भाऊ राजेंद्र पाटील याने या घटनेची फिर्याद राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे. पती चैतन्य पडवळ, सासू नंदा पडवळ, दीर विशाल पडवळ ( तिघेही रा. पडवळवाडी, ता. गगनबावडा ) या तिघांवर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेमकं आत्महत्येचं काय आहे कारण?
शुक्रवारी (दि.13 सप्टेंबर) रोजी प्रमिषा पडवळ या महिलेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 31 मार्च रोजी या महिलेचे चैतन्य पडवळ या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्याचबरोबर सासू, पती आणि दीर हे तिघे मिळून मानसिक छळ करायचे. मृत महिलेला वारंवार तिच्या चेहऱ्याच्या रंगावरून हिनवलं जात असायचं. तसेच माहेरच्या मंडळींकडून योग्य तो मानपान दिला जात नाही म्हणून त्रास दिला जायचा. त्याचबरोबर प्लॅट खरेदीसाठी माहेरच्यांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला जायचा, या सर्व जाचाला कंटाळून प्रमिषाने आत्महत्या केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
राधानगरी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली. राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.