अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर गावात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या तीन महिन्यातच एका नव दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी मुळा नदी जवळील मांगमळीत एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव वैभव आमले (वय 22) आणि स्नेहा आमले (वय 20) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव व स्नेहा आमले यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेरमधील त्यांचे मूळ गाव असलेले साकोरे येथे परत आले होते. रविवारी सायंकाळी त्यांनी मुळा नदीच्या मांगमळी येथे एका झाडाला गळफास घेतला.
दरम्यान, येथून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना त्यांचे झाडाला लटकलेले मृतदेह दिसले. ग्रामस्थांनी याची माहिती ही घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी आमले दाम्पत्याने आत्महत्या का केली, याचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे साकुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैभव आणि स्नेहा दोघेही नुकतेच आपल्या गावी साकूरला आले होते. मात्र अचानक दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन जीवन संपवलं. मात्र या दोघांनी आत्महत्या का केली ? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अचानक या दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.