अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी पाठवले आहे. याबाबत नाहाटा यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांनी मला महाराष्ट्र राज्य बाजार माहिती महासंघाचे अध्यक्ष पद दिले असून, महाराष्ट्रातील ३२२ मार्केट कमिट्यांचे नेतृत्व करण्याची संधी मला दिली आहे. तसेच राज्याच्या कृषी आणि पणन मंडळावर संचालक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.
त्याचबरोबर मला अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. असे असतानाच झाल्यावर मला धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक पद दिले, त्यामुळे एकाच वेळी एवढ्या पदावर काम करणे शक्य नसल्याने अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. मला या पदातून कार्यमुक्त करावे, ही विनंती. पक्षाने मला वेळो वेळी दिलेल्या कामगिरीमुळे मला काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा आभारी आहे. राजीनामा देण्यामागे कोणतीही नाराजी नसून, मी यापुढेही पक्षात संघटनात्मक काम करतच राहणार आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.