सातारा : सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले काँग्रेसने चाळीस वर्षांपासून सैनिक परिवारापासून वन रँक वन पेंशन पासून वंचित ठेवले. फक्त ५०० कोटींचा झुनझुना दाखवला. डोळ्यात धुळ फेकण्यात आणि खोटं बोलण्यात काँग्रेस पक्ष मास्टर आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला.
काँग्रेसने ६० वर्ष राज्य केले. मात्र, बाबासाहेबांचे संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. मात्र, आम्ही ३७० आर्टिकल ध्वस्त करुन टाकले. मोदीने ३७० आर्टिकल हटवले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, सातारा देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्रांपेक्षा कमी नाही. उदयनराजेंना तुम्ही येथे उमेदवार बनवले. साताऱ्यात भगवा फडकत राहिला आहे. मी आज तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही तुमच्या सेवकावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी आज इथे आलो आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आल्या आहेत, असंही मोदी म्हणाले.
२०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. तेव्हा मी रायगडच्या किल्ल्यावर गेलो होतो. कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी मी शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी ध्यानस्थी होऊन बसलो होतो. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या समाधीपासून मला प्रेरणा आणि उर्जा मिळाली. त्यामुळेच मी गेल्या दहा वर्षात आदर्श विचारांचा जगण्याचा प्रयत्न केला, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.