Shriniwas Patil Wife : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी आणि सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर आज १२ जानेवारीला सायंकाळी ६ वा. कराड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या राजकीय-सामाजिक भूमिकांमध्ये रजनीदेवी पाटील नेहमी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.
रजनीदेवी पाटील यांचा २६ जुलै १९४८ रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील आहे. १६ मे १९६८ रोजी त्यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला. श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकिय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोण आहेत श्रीनिवास पाटील?
खासदार श्रीनिवास पाटील सनदी अधिकारी होते. त्यापूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी मैत्री होती. शरद पवार यांनी राजकारणात आणले. अधिकारी असताना पवार यांनी त्यांना राजीनामा देत निवडणुक लढवण्यासाठी सांगितले. अशा प्रकारे श्रीनिवास पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला. श्रीनिवास पाटील १९९९ ते २००२ आणि २००४ ते २००९ अशा २ टर्म खासदार होते. त्यानंतर पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. १ जुलै २०१३ ते २६ ऑगस्ट २०१८ या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते.