सोलापूर: लाडक्या बहिणीने केलेला लोकसभेमधला पराभव जिव्हारी लागल्यामुळे उद्विग्न होऊन ते काहीही आरोप करत आहेत. वास्तविक पाहता शंभर खोक्याच्या मोरक्याला लाडक्या बहिणीवर आरोप करायचा अधिकार नाही, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी खा. डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार दिलीप माने, शहराध्यक्ष चेतन नरोटे, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीमधून एका कार्यक्रमासाठी सहा कोटी खर्च केवळ सभेच्या ठिकाणी एसी लावण्यासाठी, मंडप उभारण्यासाठी आणि तेथे सुविधांसाठी केला गेला. प्रत्येक जिल्ह्यात असेच सुरु आहे. गर्दीसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला गेला. लाडकी बहीण कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन मंडळातील ६ कोटी खर्ची घातल्याने महिलांसंदर्भातील विकास योजना रखडल्याचा आरोपही खा. प्रणिती शिंदे यांनी केला.
२०२४ च्या विधानसभा निवडणुका लढविण्याकरिता भारतीय जनता पार्टी जातधर्माच्या आधारावर विषारी प्रचार सुरू करेल. मात्र त्याला सर्व जनतेने ओळखले आहे. हरियाणात मतमोजणीबाबत अनेक तक्रारी आहेत. निवडणुकीच्या वेळी अधिकाऱ्यांवर आमचे सुपरव्हीजन असेल, ईव्हीएम मशीनवरही आमचे लक्ष राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, शहर मध्य या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.