कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या दोन्ही ड्रायव्हरांनी एकमेकांचे कपडे फाडले आणि एकमेकांना बेल्टने मारहाण केली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच ही फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती.
पालकमंत्री हसन मुश्रीफ आज (दि. २७) पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी आलेले असतानाच खासदार माने आणि आमदार आवाडे यांच्या मुलाच्या ड्रायव्हरांमध्ये ही हाणामारी झाली. दोन्ही नेत्यांची वाहनं पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्याने या दोन चालकांमध्ये वाद झाला. तो वाद नंतर आणखी वाढत गेला. या दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. आधी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली आणि त्यानंतर बेल्टने मारहाण केली. ही हाणामारी इतकी टोकाला गेली की त्यामध्ये दोन्ही चालकांचे कपडे फाटले.