मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे, अशातच महायुतीशी संबंध चांगले असलेल्या नेत्यांचे संबधित काहीजण यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
आधी शरद पवारांची भेट..
धैर्येशील मोहिते पाटलांनी याआधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत हे देखील उपस्थित होते. त्यानंतर अनिल सावंत आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही जागा सध्या भाजपकडे असून भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.
उमेदवारीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आधी पुण्यात थेट शरद पवारांची भेट घेतली. पंढरपूर मंगळवेढा परिसरातील भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत यांनी पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार आहोत म्हणत इच्छा व्यक्त केली आहे. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याची शक्यता सुद्धा या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे.