अहमदनगर : समाजात मुलींची संख्या कमी त्यामुळे कित्येक मुले लग्नापासून वंचित राहिले आहेत. मुलाला सरकारी नोकरी हवी किंवा पुणे, मुंबईत फ्लॅट हवा, अशा भल्या मोठ्या मागण्यांमुळे गावाकडील शेतकरी कुटुंबातील शेती करणारी मुले लग्नासाठी दारोदार भटकत असल्याचे दिसून येते. मात्र, अशा लग्नाळू तरुणांना हेरुन, त्यांच्या सोबत फसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे घडून आली आहे.
मुलीचं लग्न लावून देणाऱ्या अशाच एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन या नाव असणाऱ्या मुलीशी लग्न लावण्यात आले. विशेष म्हणजे लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उगले कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यांत तब्बल 9 तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना गंडवले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण 7 आरोपींना अटक केले आहे. पोलिस तपासात या टोळीचे अनेक करामती समोर आल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर 5 साथीदारांसह गुजरात, मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ मोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. या टोळीने आणखी दोन तरुणांना फसविण्याचा कट रचला होता. मात्र, त्या आधीच मुंगुसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना अटक केली. याप्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणाने 28 जून रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करुन टोळीला अटक केली. पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण 13 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना 11 दिवसांची कोठडी दिली आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलांना हेरायचे आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवायचे, ही या टोळीची पद्धत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील नितीन उलगे या शेतकरी मुलाला अशाच पद्धतीने या टोळीने हेरलं आणि त्यांची फसवणूक केली. लग्न झाल्यानंतर नवरा मुलगा असलेल्या नितीनच्या आईला या टोळीवर संशय आला होता. त्या संबंधित माय लेकीवर लक्ष ठेवूनच होत्या आणि तसंच झालं. लग्नाची नोटरी करण्याच्या बहाण्याने सिमरनची आई आशा पाटील हिने नितीनच्या कुटुंबियांना श्रीगोंदा येथे नेले. आधीपासूनच तिथे असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने पळून जाण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, नितीनच्या आई मंदाबाई उगले यांनी हा डाव हाणून पाडला.
पोलिसांनी मागितले पैसै
स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, सिमरन गौतम पाटील, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील , युवराज नामदेव जाधव, सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजूरामराव राठोड यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी कारवाईसाठी आणि इतर आरोपींच्या शोधासाठी उगले यांच्याकडूनच पैसे घेतल्याचा आरोप अशोक उगले यांनी केला आहे.