सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनवर अनेक आरोप झाले आहेत. विरोधी नेत्यांनी याआधी अनेकवेळा निवडणूक प्रक्रियेत गडबडीचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मारकरवाडी गावाने स्वत: च मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मारकवाडीमधील गावक-यांकडून बॅटेल पेपरवरील मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली. पण पोलीसांचा याला विरोध आहे. पोलीसांना पाहून नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकसभेला भाजपला 64 हजार मते मिळाली होती. या वेळेला 54,000 मते मिळाली आहे. मात्र ईव्हीएममशीनच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपकडे वळत असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते मशीनमध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे उत्तम जानकर यांनी यावेळी सांगितले आहे.
ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही फेरफार होऊ शकत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असतानाच जानकर यांनी गंभीर आरोप केला आहे. तसेच आपण पुराव्यानिशी सिद्ध करू, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. जानकर नेमके काय पुरावे देणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
ईव्हिएम मशीनच्या विरोधात सोलापूरमधील गावक-यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मागील चार ते पाच दिवसांपासून गावक-यांनी तयारी केली. प्रसारमाध्यमांत आल्यानंतर माळशिरसमधील मारकडवाडी गाव चर्चेत आले. प्रशासनाकडून बॅलेट पेपरवरील मतदानाला परवानगी नाकारली. तरीही गावक-यांनी मतदान घेण्याच निर्णय घेतला आहे.