Maratha Reservation : बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ १३ डिसेंबरला ५०० ट्रॅक्टरसह भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हा ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या ४२ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 143 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लक्षवेधी लढा उभारला असून राज्यभर त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना मराठा बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर थेट मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
जरांगे पाटलांच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे. पोलिसांकडून नांदेडमध्ये ट्रॅक्टर चालकांना मराठा आंदोलक, तसेच नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका.. अशा नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकारावर मराठा बांधवांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बार्शीसह राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपायला अवघे २ दिवस उरले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांकडून राज्यभरात वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. अशातच बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या 42 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.