बार्शी: बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथे भिशीच्या वादातून पतीने पत्नीची कापडी स्टोलने गळा आवळून, चाकू आणि दगडाने हल्ला करून क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर मोठ्या मुलावरही चाकूने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा समर्थ अनंत साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीवरून वडील अनंत रामचंद्र साळुंखे (५०, रा. जावळे प्लॉट, बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत मनीषा अनंत साळुंखे (४४) हिचा मृत्यू झाला, तर तेजस साळुंखे (२१) हा गंभीर जखमी झाला आहे.
मुलगा समर्थ याने दिलेल्या फिर्यादीनुसार आई मनीषा, वडील अनंत, मोठा भाऊ तेजस असे चार जणांचे कुटुंब आहे. वडील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेत, तर आई घरात शिवणकाम करीत होती. त्यामधून येणाऱ्या उत्पन्नावर प्रपंच चालत. नागोबाचीवाडी गाव शिवारात त्यांची २४ गुंठे शेती आहे. मृत मनीषा हिने दोन-तीन ठिकाणी भिशी लावलेल्या होत्या. मात्र, भिशीतील काही लोक पैसे घेऊन पळून गेल्याने भिशीतील पैशाचा आर्थिक ताण, भिशी उचलता येत नव्हती, इकडे घरावरील कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. तुझ्या भिशी लावण्यामुळेच आपण कर्जबाजारी झालो आहोत, या कारणाने अनंत साळुंखे हा मनीषा हीस शिवीगाळ, मारहाण करत असल्याचे मनीषा याने समर्थ यास दीड महिन्यापूर्वी सांगितले होते.
फिर्यादी मुलगा समर्थ यास फोन करून तुझे पप्पा अनंत यांनी माझ्या मोबाईलवर फोन करून तुझ्या आई मनीषा हिला नागोबाचीवाडीच्या शेतात जीवे मारले याची माहिती दिल्याचे त्याच्या मावशीने सांगितले. त्यामुळे समर्थ हा लागलीच शेतात नागोबाचीवाडी येथे गेला. तेव्हा घटनास्थळी शेतात बांधावरील बोराच्या झाडाजवळच आई मनीषा ही जखमी होऊन पालथ्या स्थितीत पडून तिच्या पायालगत एक मोठा दगड व चाकू पडला असल्याचे दिसले. तसेच वडील अनंत हे तिच्याजवळच थोड्या अंतरावर बसले असल्याचे दिसले. त्यानंतर आई मनीषा हिला अॅम्ब्युलन्समधून ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचारास दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मनीषा हिला तपासून ती सकाळी ८ वाजण्यापूर्वीच मृत झाली असल्याचे सांगितले.
त्यादरम्यान फिर्यादीचा मोठा भाऊ तेजस हा ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे जखमी अवस्थेत उपचारार्थ दाखल झाला होता. त्यास समर्थ याने भेटून काय प्रकार घडला ते सांगितले. आईस वाचविण्यासाठी गेलेल्या तेजसवरही वडील अनंत याने गळ्यावर, पोटावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी भेट दिली. पुढील तपास सुरू आहे.