खंडाळा : अहिरे (ता.खंडाळा) येथे शेताच्या बांधावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ असलेल्या मोहन सुरेश धायगुडे याच्या डोक्यात दगड घालून खून केला.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अहिरे (ता.खंडाळा) येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे व संशयित ज्ञानेश्वर उर्फ नोण्या धायगुडे यांची शेती असून, या दोघांमध्ये शेताच्या बांधावरुन नेहमी वाद होत असे. शनिवारी (दि.२३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नोण्या धायगुडे याने कोरण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान मोहन धायगुडे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. यावेळी संशयित आरोपी नोन्या याने मोहन यास शिवीगाळ करून ‘तुला जीवंत ठेवत नसतो’ अशी धमकी दिली होती.
दरम्यान, हा घरगुती वाद असल्याने संबंधित घटनेची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नोण्या धायगुडे व मोहन यांच्यात गावाच्या पारावर भांडण झाले आणि नोन्या याने मोहन यास मारहाण करत डोक्यात दगड घालून खून केला. यानंतर पोलिसांनी नोन्या याला ताब्यात घेतले. या घटनेची फिर्याद वैशाली मोहन धायगुडे यांनी दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.
अत्याचार प्रकरणातही आले होते आरोपीचे नाव
नोन्या याने यापूर्वी अहिरे येथील एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीचा मृतदेह निरा नदी पात्रात फेकून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, पोलीसांना या घटनेचा तपास करणे आव्हानात्मक बनले होते. परंतु, पोलीसांना घटना घडल्यानंतर काही दिवसांनी यातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. परंतु सबळ पुराव्याअभावी नोन्याची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली होती.