अहमदनगर : पोलिस असल्याचे भासवून आचारसंहिता काळात गळ्यात सोन्याची साखळी घालण्यास बंदी असल्याची बतावणी केली. त्यानंतर व्यावसायिकाकडील सुमारे सहा लाखांची सोन्याची साखळी दोघांनी लंपास केली. ही घटना केडगाव उपनगरात घडली.
बाबुराव नारायण काकडे (वय 68 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काकडे दुचाकीवरून केडगावातील त्यांच्या सुजित ट्रेडर्स दुकानात जात असताना केडगाव वेशीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना थांबण्यास सांगितले.
काकडे रस्त्याच्या कडेला थांबले असता ‘आम्ही पोलीस असून आचारसंहिता चालू असताना तुम्ही सोन्याची साखळी कशी घातली? आम्हाला तुमच्यावर संशय आहे, असे म्हणत त्यांची दिशाभूल केली. त्याचदरम्यान या दोघांनी काकडे यांच्याकडील सहा लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी मोठ्या चलाखीने काढून घेत पोबारा केला.