कोल्हापूर: दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी घरातून निघून गेली. मेहुणीने तिला लपवले आहे, असा संशय घेऊन तरुणाने मेहुणीच्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. ‘फोन करून माझी बायको कुठे लपवून ठेवली ते सांग, अन्यथा तुझ्या मुलीचा मुडदा पाडतो,’ अशी धमकी देणाऱ्या तरुणास एलसीबीच्या पथकाने बारा तासांत जेरबंद करून त्याच्या ताब्यातून बालिकेची सुखरूप सुटका केली. संतोष सुरेश माळी (वय ३३), प्रथमेश सतीश शिंगे (वय ३५, दोघे रा. नवीन वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोल्हापुरातील यादवनगर परिसरातील सराईत गुन्हेगार संतोष माळी याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी नोव्हेंबर, २०२४ मध्ये घर सोडून निघून गेली. आपल्या पत्नीला घालवण्यास मेहुणी नकुशा कुमार चव्हाण ही जबाबदार आहे. पत्नी सध्या कुठे आहे, हे नकुशाला माहीत आहे, पण ती सांगत नाही, त्यामुळे संतोष चिडून होता.
३ डिसेंबर, २०२४ रोजी दुपारी नकुशा चव्हाण हिच्या पाच वर्षाच्या मुलीचे संतोषने अपहरण केले. यावेळी संतोषसोबत त्याचा मित्र प्रथमेश शिंगे हासुद्धा होता. निपाणी येथे जाऊन संतोषने नकुशाला फोन करून ‘माझ्या पत्नीला समोर आण, तिचा पत्ता सांग, अन्यथा तुझ्या मुलीचा खून करणार, अशी धमकी देऊन फोन कट केला. दारुडा आणि गुन्हेगारी वृत्तीचा संतोष मुलीच्या जीविताला धोका पोहोचवू शकतो, हे लक्षात आल्यानंतर नकुशा यांनी फोन करून राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंद झाली.
बालिकेचे अपहरण झाल्याचे समजताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तांत्रिक साधनांचा वापर करून तपास केला. बालिकेचे अपहरण करणारा संतोष माळी याने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याचे लोकेशन सापडत नव्हते. पोलिसांनी संशयित व त्याचा सहकारी प्रथमेश शिंगे यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. तेव्हा संतोषने प्रथमेशला तवंदी घाटात सोडून तो मुलीला घेऊन निपाणीला गेला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक निपाणी येथील अर्जुननगर भागात गेले. तेथून संतोष व पाच वर्षाच्या बालिकेस ताब्यात घेतले. मुलीला तिची आई नकुशा यांच्याकडे सुखरूप परत सोपवले, त्यानंतर संतोष माळी व अपहरणासाठी मदत करणारा प्रथमेश शिंगे या दोघांना पोलिसांनी अटक केली, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि चेतन मसुटगे, अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, विशाल खराडे, प्रवीण पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, नामदेव यादव, कृष्णांत पिंगळे, राजेंद्र वरंडेकर, सायबरचे सुहास पाटील यांनी तपास केला.
संशयित सराईत गुन्हेगार
संशयित संतोष माळी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर राजारामपुरी, राधानगरी, लक्ष्मीपुरी अशा तीन पोलीस ठाण्यात गंभीर व दखलपात्र स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच प्रथमेश शिंगे याच्यावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
चिमुकलीचा जीव वाचला
पाच वर्षाच्या बालिकेच्या जीवितास धोका होता, कारण मद्यपी संतोष माळी तिला नदीत, ओड्यात अथवा डोंगरावरून फेकून ठार मारेल, अशी भीती होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता शोधमोहीम राबवली. निपाणी येथे जाऊन संतोषला ताब्यात पेठले. मुलीची सुटका केली. पोलिसांच्या तत्परतेने बालिकेचे प्राण वाचले.