पिलीव (सोलापूर): माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे अज्ञात कारणावरून अमानुषपणे शरीराला चटके देऊन युवकाचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवार, ११ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या उघडकीस आली. आकाश अंकुश खुर्द (वय २८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हा सोमवार, १० मार्च रोजी रात्री ११.३० च्या दरम्यान पिलीव येथील आपल्या निवासस्थानी होता. अज्ञात व्यक्तीचा फोन आल्यानंतर आईला दहा मिनिटांत मी माघारी आलो, असे सांगून तो घराबाहेर पडला. त्या रात्री तो घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवार, ११ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पिलीव-माळशिरस रोडवरील फॉरेस्टच्या ठिकाणी त्याचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर तत्काळ पोलीस हवालदार धनाजी झगडे व पंडित मिसाळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याठिकाणी पोलीस उपअधीक्षक मडावी यांनी भेट दिली.
आकाश यास गंभीर मारहाण करुन त्याच्या पाठीवर, दंडावर, मांडीवर व पोटावर तसेच इतर ठिकाणी कशाने तरी मारहाण करुन चटक देऊन त्यास गंभीर जखमी करुन पूर्णपणे विवस्त्र करून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरणातून किंवा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.