सोलापूर: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या कार्यालयात एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरातील दत्तनगर परिसरात ही घटना घडली. अल्लाउद्दीन शेख (वय 80 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. शेख यांनीआत्महत्या का केली? याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या सोलापुरातील दत्तनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सिटू संघटनेच्या लालबावटा कार्यालयामध्ये एका वृद्धाने दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. दरम्यान अल्लाउद्दीन शेख यांनी शनिवारी सकाळी माजी आमदार आडम यांची भेट देखील घेतली होती. मात्र, दुपारी कार्यालयात कोणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान शेख हे सध्या आमचा कार्यकर्ता नसून काही वर्षांपूर्वी त्यांनी माकपसाठी काम केले होते, असे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नव्हता, असे नरसय्या आडम यांच्या कार्यालयाने सांगितले.
शनिवारी सकाळी शेख यांनी आडाम मास्तरांसोबत चर्चा केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास कौटुंबिक कारणास्तव नरसय्या आडम हे कार्यालयातून बाहेर पडले. त्या सुमारास कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. त्यानंतर शेख यांनी कार्यालयातील एका खोलीत स्वत:ला बंद करत गळफास घेतला.