कोल्हापूर : मुंबई क्राईम बँचमधून बोलतोय, ‘तुमचे पती मोठ्या रुग्णालयात नोकरीला आहेत. त्यांच्या बँक खात्यावर २० लाख रुपये शिल्लक आहेत. त्यांचे लोकेशन आम्ही पाहिले आहे. तुमच्या पतीचा एन्काऊंटर केला तर आम्हाला रिवॉर्ड मिळते; पण ते थांबवायचे असेल तर तातडीने १८ लाख ऑनलाईन पाठवा,’ अशी धमकी देऊन एका भामट्याने कोल्हापुरातील डॉक्टर महिलेस १८ लाखास गंडा घातला. डॉ. स्मिता अशोक सरुडकर (वय ४६, रा. प्रतिभानगर) यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. १८ लाख रुपये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडणाऱ्या संशयिताचे बँक खाते गोठवण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी संबंधित बँकेस पत्रव्यवहार केला. व्हॉटस् अॅपवरून आलेल्या कॉलचा नंबर मात्र अजून पोलिसांना मिळालेला नाही.
३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२४ दरम्यान अनोळखी व्यक्तीने डॉ. सरूडकर यांना व्हॉटस् अॅप कॉल केला होता. त्यांचा आधार कार्ड नंबर, सध्याचे लोकेशन, बँक खात्याची वैयक्तिक माहिती देऊन विश्वास संपादन केला. तुमच्या पतीचा एन्काऊंटर केला जाणार आहे. ते टाळायचा असल्यास पैसे द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. तसेच स्वतःच्या बँक खात्यावर १८ लाख रुपये वर्ग करण्यास भाग पाडले.
दोन ते तीन दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. सरूडकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयिताचे बँक खाते गोठवण्यासाठी संबंधित बँकेशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. तसेच ज्या नंबरवरून फोन आला त्या नंबरचा शोध सुरू आहे; मात्र संशयिताने सर्व्हरचा वापर करून कॉल केल्याने पोलिसांना अजून नंबर मिळालेला नाही. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.