सांगली : किरकोळ कारणावरून जावयाने सासऱ्यास दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कर्नाळ येथे घडली. याबाबत जखमी शिवाजी कृष्णा रास्ते (वय ६५, रा. गोंधळेवाडी, ता. जत) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गजानन प्रकाश लोखंडे (वय ३०, रा. सोनी, आण्णा भोसले कमान, ता. मिरज) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शिवाजी रास्ते यांच्या मुलीचा आणि जावई गजानन लोखंडे यांचा वाद होता. शिवाजी रास्ते यांनी हा वाद सामोपचाराने मिटविला होता. मुलीस घरी घेऊन जाण्याविषयी शिवाजी रास्ते यांनी जावई गजानन लोखंडे याचा भाऊ संजय यांना दूरध्वनीवरून सांगितले. मुलीला नेण्यासाठी जावई गजानन हे कर्नाळ येथील घरी आला असता त्याचा सासऱ्याशी पुन्हा वाद झाला. यावेळी संशयित गजानन याने तेथेच पडलेला दगड घेऊन सासरे शिवाजी रास्ते यांच्या डोक्यात मारला आणि त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.