नगर (Ahmednagar): पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने नगरच्या माळीवाडा परिसरातील ब्राम्हणगल्ली येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरुन नेली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे दाखल गुन्हा रजि. करण्यात आला होता. मात्र कोतवाली पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास करत १२ तासात आरोपी ताब्यात घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सात जानेवारी रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास अज्ञाताने ब्राम्हण गल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरुन नेल्याची तक्रार कमलेश लक्ष्मण जंजाळे (रा.ब्राम्हण गल्ली माळीवाडा अहमदनगर) यांनी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला. गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. चोरी करणारा इसम हा रोहीदास उर्फ रोह्या/रावश्या लक्ष्मण पलाटे (वय ३८) असुन तो मिरी माका, ता. नेवासा येथे राहणारा असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ सादर ठिकाणी जाऊन शोध घेत आरोपीस ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपले नाव रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे असल्याचे सांगितले. चौकशी दरम्यान त्याने प्रथम उडवा उडवा उडविची उत्तरे दिली. त्यास प्राप्त सीसीटीव्ही पुराव्यांच्या दाखवत आधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच चोरलेली दानपेटी ही त्याने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवल्याची माहीती दिली. त्यानंतर सदर ठिकाणावरुन चोरी झालेली दानपेटी व त्यामधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत करण्यात आली. पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, सपोनि विश्वास भान्सी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी इनामदार, शाहीद शेख, सलीम शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाढे, संदिप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, इसराईल पठाण, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू, नितीन शिंदे आदींनी केली आहे.