पाचगणी : अति संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकामांचा नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे. भिलार,भोसे व खिंगर येथील अनधिकृत बांधकामावर आज अचानक एकाच वेळी जिल्हा प्रशासनाने आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हातोडा उगारला. महाबळेश्वर तालुक्यातील पाच ठिकाणी ही कारवाई झाली असून यामध्ये भिलार येथील संकला, भोसे येथील प्रवीण छेडा, खिंगर येथील खंबाटा अशा बांधकामावर आज मोठ्या फौज फाट्यासह प्रसानाने बुलडोझर फिरवला आणि अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामावर ही कारवाईची मोहीम आज पहाटे नियोजनबध्द रित्या सुरू झाली. यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव , महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील , वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळा तहसीलदार विजय पाटील, महाबळेश्वर-पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी, वैद्यकीय टीम, महसूल अधिकारी तालुक्यातील सर्व मंडलअधिकारी व तलाठी आदी घटनास्थळी कारवाईच्या वेळेत उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दहा ते बारा जेसीबी आणि फॉकलन या मशिनच्या साह्याने अनधिकृत बांधकामाने उध्वस्त करण्याचे काम आज सकाळपासून चालू आहे. ही अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम नियोजनबध्द रित्या राबवली गेली. सर्व फौजफाटा काल पासूनच पांचगणीत दाखल झाला होता. त्यामुळे कारवाई होणार हे पक्के झाले होते. सकाळी कुणालाही समजण्याआधी पहाटेच सर्व यंत्रणा ठरलेल्या बांधकामांवर पोहोचली आणि अचानक या मोहिमेने वेग घेतला.
सकाळ होताच यातील काही बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. या मोहिमेची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. आज पहाटे अचानक मोहीम सुरू करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने जेसीबी, फोकलन मशीनच्या साहाय्याने अनाधिकृत इमारतीचे बांधकाम उदध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे. या विषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती मिळू शकली नाही.
या कारवाईने अनेक बांधकाम व्यवसायिक व बांधकाम मालक यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्र धास्तावले आहेत. तर ही कारवाई मोठ्या धनिकांवर होणार की, सामान्य नागरिकाना ही यात भरडले जाणार याबाबत चर्चा सुरू आहे.
चौकट : प्रशासनाची अनाधिकृत बांधकामाविरुद्ध मोहीम स्वागतार्ह असली तरी किती अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार..? याची माहिती नाही. त्यामुळे ही मोहीम कायम चालू राहणार की मोजक्याच बांधकामांवर कारवाई होऊन थांबणार याबाबत संशय व्यक्त होत आहे.
चौकट : अनाधिकृत बांधकामावर कारवाईच्या आदल्या रात्री पाचगणी येथे फौज फाटा सज्ज ठेवण्यात आला होता. मात्र याची पुसटशीही कल्पनाही कोणास लागू दिली नव्हती. अतिशय गुप्तपणे ही मोहीम राबविण्यात आली आहे.