कोल्हापूर : काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या उमेदवारानेच उमेदवारी माघार घेतल्याने काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये राहिलेला नाही. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचा उमेदवार विरुद्ध अपक्ष उमेदवार अशीच लढत होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
दरम्यान काँग्रेसची उमेदवारी मिळूनही अवघ्या काही तासात ती रद्द करण्यात आल्याने राजेश लाटकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आज (दि. ४) सकाळपासून राजेश लाटकर उमेदवारी अर्ज माघार घेणार की नाही? अशी चर्चा असतानाच उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. नाईलाजाने मधुरिमाराजेंना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, ते एक चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी यावेळी दिली आहे.