माढा: माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच अवघ्या चोवीस तासांच्या आत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. कारण, शिवसेना- शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
शिवसेनेचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्ष सोडताना त्यांनी आपले पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्याबरोबरच मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवरही आरोप देखील केले आहेत.
संजय कोकाटे पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही. गेल्या निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवाराचा जीव तोडून प्रचार केला. मात्र, विधानसभेला भाजपने आपल्याला मदत केली नाही. या उलट युती म्हणून शिवसेना उमेदवाराचे काम करणे अपेक्षित असतानासुद्धा भाजपच्या संबंधित नेत्याने आमच्या विरोधात काम केले. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे संजय कोकाटे यांनी सांगितले.
विचारांशी गद्दारी शक्य नाही,
लुटारूंना साथ देणं शक्य नाही,
भाजपचा प्रचार करणं शक्य नाही !अखेरचा जय महाराष्ट्र !@mieknathshinde @Shivsenaofc pic.twitter.com/MflJoHgiqL
— Sanjay (baba) kokate (@KokateBaba) March 14, 2024