प्रमोद आहेर
श्रीगोंदा : लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारला मोठ्या प्रमाणात देशात अनेक ठिकाणी पराजय पत्करावा लागल्यानेच त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. पण, आम्ही लाडक्या बहिणींना नुसते पैसे नाही, तर महिलांना सुरक्षा कवच पण देऊ. असे आश्वासन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे श्रीगोंदा येथील जाहीर सभेत बोलताना दिले आहे.
श्रीगोंद्यातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ दि. १४ रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शेख महंमद महाराज प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, श्रीगोंद्यातील साजन पाचपुते याच्यासाठी महायुतीकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अनुराधा नागवडे यांना दिली त्यामुळे आमदार मी नाही तर पक्षाचा पाहिजे, ही भूमिका त्यांनी बजावली.
श्रीगोंद्यातील शकुनी मामा आणि त्यांची माजलेली मांजरे यांनी बंडखोरी करत, अपक्ष उमेदवारी केली आहे. त्याच्या उमेदवारीने महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात येऊन वेगवेगळी आमिषे दाखवली, परंतु त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पराभव झाला. आज श्रीगोंद्यात ४० वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. साकळाई कुकडी घोड पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर आजपर्यंत तोडगा निघाला नाही. आता ते म्हणतात बोगदा करू पण त्यांनाच मतदान केल्यास तुमच्या आयुष्याचा बोगदा होईल, पण प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे अनुराधा नागवडे यांना विजयी करा.
प्रश्न निकाली काढू, आज भाजपाला साखर कारखाने आजारी पाडून मोदी शहा यांना अदानी-अंबानी या मुगळ्यांच्या घश्यात घालायचे. हे भाजपचे गणित आहे, भाजपचे नेते जातात तिकडे खातात, त्यांनी अनेक उद्योग धंदे गुजरातला पळविल्याने आपल्याकडे बेरोजगारी वाढली आहे. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यात पैशे खाणाऱ्यांना जनता निवडून देणार नाही. आम्ही राज्यात प्रत्येक ठिकाणी नागपूर सुरत यासह अनेक ठिकाणी मंदिरे बांधणार असेही त्यांनी जनतेला संबोधित केले.
ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूर प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एक तास बसविले त्यामुळे महिलांना पोलीस ठाण्यात जाण्याची भीती वाटते, म्हणून महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. आज लाडक्या बहिणीला दीड नाही, तर ३ हजार देणार पण पैश्याबरोबर सुरक्षेची गरज आहे. ती आम्ही देणार असेही ठाकरे म्हणाले. शेतकरी अडचणीत आहे. तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची आहे. तर खते कीटकनाशके यासह शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूवरील जीएसटी हटवा, तसेच जीवनावश्यक वास्तूचे दर कमी करा. अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुलींच्या बरोबरीने मुलांना पण मोफत शिक्षण देऊ असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे. माझा सख्खा भाऊ विरोधात उभा राहिला तरी विरोधात प्रचार करेल, त्यामुळे बंडखोरी करणार नाही. त्यासाठी श्रीगोंदा मतदार संघात राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी केलीय पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून नागवडे यांना पाठिंबा देऊन मतविभाजन टाळावे, असेही थोरात म्हणाले. यावेळी खासदार फौजिया खान,मिलिंद नार्वेकर,शुभानअली शेख,बाळासाहेब थोरात,शशिकांत गाडे, राजेंद्र नागवडे, यासह जिल्ह्यातील अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी अथांग जनसागर उसळला होता. कार्यक्रमाच्या शेवटी शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी आभार मानले.
निलेश लंके यांनी आघाडीचा धर्म पाळायला पाहिजे, लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना सर्वानी मताधिक्य दिल्याने ते निवडणुकीत विजयी झाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी महाविकास आघाडीचा प्रचार करायला पाहिजे. अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.