अहिल्यानगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या गाडीवर अहिल्यानगर येथे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ते पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे आयोजित केलेल्या ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर बायपास रोडवरील सारंगी हॉटेलजवळ हा हल्ला झाला. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यात हाके यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने यात त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ते घटनास्थळावरून पळून गेले.

गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवत असून, राज्यभर चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज दैत्यनांदूर येथील मेळाव्यात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मेळाव्याला जातानाच त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली आणि अज्ञान हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान, लक्ष्मण हाकें यांनी काल आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, शत्रु वाढत आहेत, असं म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांच्या कारवर हा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.







