सातारा : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला चुकीच्या दस्ताची दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणेकामी चार हजार रुपयांची लाच घेताना कुडाळ (ता. जावली) येथील तलाठी शरद लिंबराज साळुंखे (वय ५४, रा. कोहिनूर रेसिडेन्सी, मधली आळी, वाई) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी करण्यात आली. वाई पोलीस ठाण्यात याबाबत साळुंखे याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार यांनी दहा गुंठे जमिनीचा दस्त केला होता.
सातबारावर नोंद होणेकामी त्यांनी अर्ज दिला होता. मात्र, तो दस्त चुकीचा असून दस्तामध्ये दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणेकामी तलाठी साळुंखे याने तक्रारदारांना पाच हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती या कामासाठी चार हजार रुपये देण्याचे ठरले. तलाठी सजा परिसरात साळुंखे याला ही लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार नितीन भोगावले, पोलीस हवालदार नीलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, अमोल खानविलकर यांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.