कोल्हापूर : चिथावणीखोर व आक्षेपार्ह रिल्स तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी २० तरुणांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले. संबंधित तरुणांसह त्यांच्या पालकांनाही पोलिस ठाण्यात बोलवून समज देण्यात आली. यापुढे पुन्हा आक्षेपार्ह रिल्स व्हायरल केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.
आक्षेपार्ह रिल्स तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल केल्या जात आहेत. यातून गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्षाला खतपाणी मिळत आहे. रिल्समधून एकमेकांना आव्हान दिले जात आहे. अशा चिथावणी देणाऱ्या रिल्समुळे शहरात गेल्या दोन महिन्यात दोन खून झाले. तसेच खुन्नस देणे, मारामारी, एकमेकांचा पाठलाग करणे, दहशत माजवण्याचे प्रकार सुरूच आहेत.
याला आळा घालण्यासाठी आक्षेपार्ह रिल्स तयार करून ते व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर उपअधीक्षक अजित टिके यांनी शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि शाहूपुरी पोलिसांना आक्षेपार्ह रिल्स करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जुना राजवाडा पोलिसांनी रिल्सची पडताळणी करून १२ तरुणांचे मोबाइल जप्त केले.