कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 42 फूट 10 इंच इतकी झाली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे.
पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. या गावाच्या सर्व रस्त्यावर पाणी आले आहे. यापूर्वीच्या महापुरात सर्वाधिक फटका चिखली आणि आंबेवाडी गावाला बसला होता, त्यामुळे प्रशासनाने चिखली गावातील बहुतांश लोकांना स्थलांतर केले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील 90 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चिखली आणि आंबेवाडी गावचा अंशत: संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती दलातील तुकडी सज्ज करण्यात आली आहे. पंचगंगेने बुधवारी मध्यरात्रीनंतर पातळी ओलांडली आहे.