कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीने सर्व दहा जागा जिंकत महाविकास आघाडील क्लीन स्वीप दिला आहे. काँग्रेसला तर हद्दपार करून टाकले आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद निश्चित आहे, तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे अमल महाडिक यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालकमंत्रिपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात असून, मुश्रीफ क्षीरसागर यांच्यात रस्सीखेच होणार आहे.
विधानसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. याचीच पुनरावृत्ती करत महायुतीने महाविकास आघाडीचा पुरता सुपडासाफ केला आहे. काँग्रेसचा हात हद्दपार करून टाकला आहे. २०१९ च्या निवडणुकीत ही वेळ भाजपवर आली होती. या निवडणुकीत भाजपचे महाडिक यांच्यासह इचलकरंजीतून निवडून आलेले राहुल आवाडे हे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित आहे. राधानगरीतून सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्ट्रिक करणारे शिवसेना शिंदे गटाचे आबिटकर यांचेही मंत्रिपद निश्चित मानले जाते. क्षीरसागर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या गोटातील आहेत. त्यामुळे ते निवडणुकीतील विजयाप्रमाणे मंत्रिपदही खेचून आणतील.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झालेले अमल महाडिक यांना भाजप कोट्यातून मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. विनय कोरे यांच्यासह अशोकराव माने असे दोन आमदार आहेत; परंतु ‘जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उनकी भागीदारी’ या तत्त्वानुसार गेल्यास आमदार कोरे यांना मंत्रिपदापासून दूरच राहावे लागण्याची शक्यता आहे.